
नागपूर येथे आयोजित बिरसा कला संगम राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत इच्छागव्हाण ता.तळोदा जि. नंदुरबार येथील साजन वळवी यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून भव्य यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, हा मानाचा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके आणि महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते, ही साजनसाठी मोठी गौरवाची बाब ठरली.
कोण आहेत साजन वळवी?
साजन वळवी यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण गावातील एका साध्या व कष्टकरी कुटुंबात झाला. आई सौ. लताबाई व वडील श्री. रोहिदास वळवी यांनी शेतमजुरी करत आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. शिक्षणाप्रती असलेली त्यांची निस्वार्थ भावना साजनच्या यशामागील सर्वात मोठी ताकद ठरली.
लहानपणापासूनच साजनला फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. तो जिथे जाई तिथे फोटो काढत फिरत असे. त्या वेळी त्याला स्वतःलादेखील कल्पना नव्हती की हा छोटासा छंद त्याला एक दिवस राज्यस्तरीय व्यासपीठावर नेईल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित होण्याचा गौरव मिळवून देईल.
यापूर्वीची लक्षणीय कामगिरी
साजन यांची क्षमता आणि प्रतिभा अनेक स्पर्धांमधून आधीच सिद्ध झाली आहे.
1) युवारंग स्पर्धा — दुसरा क्रमांक
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी आयोजित केलेल्या युवरंग स्पर्धेत साजन यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता.
2) जिल्हा युवा महोत्सव जळगाव — तिसरा क्रमांक
जिल्हा युवा महोत्सव जळगाव आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला होता.
या सलग यशांनी त्यांची ओळख एक सक्षम, सातत्यपूर्ण आणि सर्जनशील फोटोग्राफर म्हणून अधिक ठळक केली आहे.
शैक्षणिक प्रवास
१ली ते ४ थी : जि. प. शाळा, इच्छागव्हाण
पुढील शिक्षण : यशवंत विद्यालय, नंदुरबार (१२वी पर्यंत)
पदवी शिक्षण : GTP महाविद्यालय नंदुरबार
पदव्युत्तर (MSW) : लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क, जळगाव
शिक्षण पूर्ण केलेनंतर साजन यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कारकीर्दीची वाटचाल सुरू ठेवली. सध्या तो नाशिक येथे CSRBOX संस्थेत संशोधन फेलो म्हणून कार्यरत आहेत.
साजन यांचे मनोगत
साजन वळवी सांगतात—
“माझ्या आई-वडिलांनी शेतमजुरी करून मला शिकवलं. ते स्वतः शिक्षित नसले तरी मला कधीच शिक्षणात कमी पडू दिलं नाही. शक्य तितकी आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्यांनी दिलं. या प्रवासात मित्रमंडळी, गुरूजन, आणि ज्यांनी मार्गदर्शन केले त्या सर्वांचे मी मनापासून ऋणी आहे.”
साजन विशेष उल्लेख करतात—
“आमच्या इच्छागव्हाण गावातील माझा मित्र उमेश वळवी यांनी मला सतत प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या कलात्मक प्रवासाला योग्य दिशा मिळाली.”
भविष्यातील ध्येय
साजन यांचे लक्ष्य फोटोग्राफी क्षेत्रात अधिक प्रगती करणे, संशोधनाच्या कामातून समाजासाठी योगदान देणे आणि आदिवासी कलांचे दस्तऐवजीकरण जगापर्यंत पोहोचवणे आहे.
तरुणांना मार्गदर्शन करून त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा साजन यांचा मानस आहे.
प्रेरणादायी संदेश
साजनचा प्रवास हे सिद्ध करतो की मेहनत, सातत्य आणि मार्गदर्शन असेल तर कोणतेही स्वप्न मोठे नसते.
गरीब घरातील मुलांनाही मोठे यश मिळू शकते, याचा हा उत्तम आदर्श आहे.
इच्छागव्हाणच्या मातीत जन्मलेला एक साधा मुलगा, आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने आज राज्यस्तरीय व्यासपीठावर चमकला आहे. साजन वळवी यांचे हे यश केवळ त्यांचेच नाही तर इच्छागव्हाण, तळोदा तालुका आणि संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
साजन वळवी यांच्या उज्ज्वल भविष्यास हार्दिक शुभेच्छा!
