“कागदपत्रे कशी जळाली नाहीत? पाच मृतदेह सापडले, मग सहावा कुठे?” — अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न

“कागदपत्रे कशी जळाली नाहीत? पाच जणांचा मृत्यू झाला, मग सहावा व्यक्ती कुठे आहे?”
असे गंभीर आणि धक्कादायक प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, अपघाताबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात एकूण पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. ही बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार, राजकीय नेते तसेच सर्वसामान्य जनता अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही.

या अपघातानंतर घातपात झाला की तो केवळ अपघात होता, याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू झाले होते. मात्र, शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना हा घातपात नसून अपघातच असल्याचे स्पष्ट केले. असे असतानाही आमदार अमोल मिटकरी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत या घटनेबाबत गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना अमोल मिटकरी म्हणाले की, “अजितदादांना जाऊन आता पाच दिवस झाले आहेत. अख्खा महाराष्ट्र आणि आम्ही सर्वजण अजूनही त्या धक्क्यात आहोत. अजितदादांच्या मृत्यूसंदर्भात ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत अनेक चर्चा सुरू आहेत. काही लोकांच्या सांगण्यावरून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत.”

ते पुढे म्हणाले, “अजितदादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नव्हता, एवढा भीषण अपघात झाला. मग अशा परिस्थितीत त्यांची कागदपत्रे कशी काय सुरक्षित राहिली? त्यांना साधा जाळसुद्धा लागला नाही, हे कसे शक्य आहे? हा प्रश्न निश्चितच संशय निर्माण करणारा आहे.”

याशिवाय, विमानात किती लोक होते, याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. “सुरुवातीला टीव्हीवर विमानात सहा लोक होते, अशा बातम्या चालल्या. मात्र, नंतर समोर आलेल्या माहितीनुसार फक्त पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. कॅप्टन, को-कॅप्टन, एक महिला कर्मचारी, अजितदादा आणि त्यांचे बॉडीगार्ड – अशी पाचच नावे समोर येतात. मग सहावा व्यक्ती नेमका कुठे आहे?” असा सवाल त्यांनी केला.

तसेच, विमानाचे टेक-ऑफ नेमके किती वाजता झाले, प्रवाशांची अंतिम यादी कोणती होती, याबाबतही अधिकृत माहिती स्पष्टपणे समोर यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत नागरिकांच्या मनातील शंका दूर होणार नाहीत, असे मतही मिटकरी यांनी व्यक्त केले.

1 thought on ““कागदपत्रे कशी जळाली नाहीत? पाच मृतदेह सापडले, मग सहावा कुठे?” — अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *